university of logo
university of mumbai
 
extra mural studies
ems
 
ems ग्रामीण भागात बहि:शाल शिक्षण विभाग  
 
 
 
कोकणातील ग्रामीण भागात बहि:शाल शिक्षणाचा कार्यक्रम चालतो. मात्र हा कार्यक्रम घेण्यासाठी त्या त्या गावातून मागणी यायला हवी. हे ऐच्छिक तत्व असल्यामुळे केवळ ज्या गावांमध्ये उत्साही कार्यकर्ते आहेत तेथेच हे कार्यक्रम रुजतात.
 

या कार्यक्रमातून काय मिळते?

 

ज्या गावांतून बहि:शाल शिक्षण कार्यक्रम स्वीकारला जातो त्यांना आपल्या सोयीप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करता येते. शालेय , विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, मिश्र गटासाठी त्यांच्या सोयीच्या ठिकाणी व सोयीच्या वेळेत कार्यक्रम ठेवता येतात.

बहि:शाल शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या विषयांवरील रंजक, माहितीपूर्ण शिबिरे, महिलांची कौशल्ये, माहिती आणि विज्ञाननिष्ठा वाढवतील अशी शिबिरे आखली आहेत. जे विषय ग्रामीण भागातही हवेहवेसे असतात पण शहरांप्रमाणे ते शिकवण्याची सोय नसते, अशा विषयांत प्रशिक्षण देणारी शिबिरे बहि:शाल शिक्षण विभागाने ग्रामीण केंद्रांना उपलब्ध करुन दिली आहेत.

 

ग्रामीण शैक्षणिक शिबिरे 

 

स्त्रियांसाठी 

 
कार्यक्रम   कालावधी 
गॄहविज्ञान ७ दिवस रोज ३ सत्रे
आयुर्वेदिक दॄष्टिकोनातून स्त्री- स्वास्थ्य ७ दिवस रोज ३ सत्रे
परसबाग शिबिर ६ दिवस रोज ३ सत्रे
माता-बालसंगोपन ३ दिवस रोज ३ सत्रे
कुटुंबासाठी पौष्टिक-आहार ३ दिवस रोज ३ सत्रे
रुग्णांसाठी पथ्याहार २ दिवस रोज ३ सत्रे 
अंधश्रध्दा निर्मूलन कार्यकर्ता प्रशिक्षण                                                       ३ दिवस रोज ३ सत्रे
मसाज पध्दती शास्त्रीय ओळ्ख एकूण १० सत्रे
 

मिश्र गट 

 
कार्यक्रम  कालावधी 
नाट्यशिबिर ५ दिवस रोज ३ तास
शोभिवंत मत्स्यालय ३ दिवस रोज ३ तास
 

शालेय विद्यार्थी

 
कार्यक्रम कालावधी
वेध घेऊ विश्वाचा-खगोलशिबिर ३ किंवा ५ दिवस
परिसर अभ्यासशिबिर ७ दिवस रोज ६ तास
निसर्ग निरीक्षण शिबिर ३ दिवस रोज ६ तास
जनसंभाषण कला ३ दिवस रोज ३ तास
गणितातील गमतीजमती (९वी व १०वी साठी) ३ दिवस रोज ३ तास
भौतिकशास्त्रातील गमतीजमती (९वी व १०वी साठी) २ दिवस रोज ३ तास
नाट्यप्रशिक्षण ५ दिवस रोज ६ तास
ओरिगामी ( कागदी कला ) ३ दिवस रोज ३ तास
 
 

निसर्ग निरीक्षण परिसर अभ्यास हा विषय नव्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेच. जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही जीवशास्त्र शिकताना या शिबिराचा फायदा होऊ शकतो. या शिबिरातून तयार होणारे शैक्षणिक तक्ते व इतर साधने गावातल्या शाळेतच रहातात.

वेध घेऊ विश्वाचा-सप्ताह खगोलशास्त्राचा या शिबिरात सूर्यमाला, विश्वाची निर्मिती, तारे, अवकाशस्थ इतर वस्तू, प्रकाशाचा वेग या विषयांची विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. लघुतारांगण, दुर्बिण, स्लाइड्स या माध्यमातून शिकवले जाते.

नाट्यशिबिरात केंद्राच्या गावातील उत्साही विद्यार्थ्यांना, इतर तरुणांना नाट्य अभिनय, दिग्दर्शन, नवे प्रयोग, संवाद, शब्दफेक या विषयांवर मार्गदर्शन लाभू शकेल. शिबिराच्या अखेरीस त्यांच्याकडून छोटे  नाट्य प्रयोग, नाट्य छटा करवून घेण्यात येतात.

स्त्रियांसाठी असलेल्या शिबिरात ग्रामीण स्त्रियांच्या उपयोगी येतील अशी काही शास्त्रोक्त सोपी तंत्रे शिकवणे, त्यांना आपल्या व आपल्या कुटुबियांच्या सर्वांगीण स्वास्थ्याच्या दॄष्टीने जागॄत करणे ही उद्दिष्टे साध्य होतात. परसबाग प्रशिक्षण हे मुख्यत्वे स्त्रियांसाठी म्हणून आखले असले तरीही रुची असल्यास पुरुष मंडळींसही खुले असेल. या शिबिरात कॄषी, फलोद्यान विकास, भाजीपाला लागवड या विषयांतील जाणकार तज्ञ येतील. छोटयाशा परसबागेत कमीत कमी खर्चात उपलब्ध साधनांचा वापर करुन जास्तीत जास्त फुले, मसाले, भाज्या कशा मिळविता येतील या दॄष्टीने शिस्तबध्द आखणीचे प्रशिक्षण ग्रामीण भागात सर्वांना उपयोगी ठरणार आहे.

१९९२ पासून अशा प्रकाराची अनेक शिबिरे विभागातर्फे घेण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील केळ्वे, पालघर, बोर्डी, मुरबे, भिवंडी, विरार; रायगड जिल्ह्यातील कापडे, विघवली, देवळे, करुळ, गोरेगाव, श्रीवर्धन; रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी, पोफळी, गुहागर, चिपळूण, अलोरे, मंडणगड, ओणी, मुर, भरणे; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडळ, खारेपाटण, आचरे, आजगाव, पणदूर, मोगरणे, काळसे या गावांमध्ये या शिबिरापैकी प्रत्येकी दोन ते तीन शिबिरे झाली आहेत. हे शिबिरांचे कार्यक्रम ज्या गावांत होतात त्याच्या शेजारच्या लहान गावांनाही या कार्यक्रमांचा थोडा फार प्रमाणात लाभ दिला जातो.

या शिबिरांमुळे विशेषतः शालेय विद्यार्थ्याना फारच फायदा होतो. शिकवण्याची वेगळीच पध्दत, निरीक्षण व प्रत्यक्ष कॄतीवर भर असल्यामुळे सुट्टीतल्या आनंददायक शिबिराचा अनुभव त्यांना मिळतो.

या उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी आपल्या गावात बहि:शाल शिक्षण  केंद्र सुरु करणे आवश्यक आहे.

गावातील शाळा, महिला मंडळ किंवा सर्वांना जवळची वाटेल अशी एखादी संस्था हे  केंद्र सुरु करु शकते.

नवीन बहि:शाल शिक्षण केंद्र वर्षभरात केव्हाही स्थापन करता येते.

बहि:शाल शिक्षण केंद्राने शाळा, वाचनालय, इतर सांस्कॄतिक कार्य करणार्‍या संस्था व संघटना यांना घेऊन सोबत काम करायचे आहे.

शिबिरे ठरवताना वर्षाच्या सुरुवातीपासून ठरवायला हवीत. ही शिबिरे शक्यतो उन्हाळी व हिवाळी सुट्ट्यांच्या कालखंडात आयोजित करावीत. शिबिरांच्या आयोजना संदर्भात विभागाशी, संचालकाशीही थेट बोलावे.

कार्यक्रमाच्या आयोजनाची म्हणजे संपर्कावरील खर्च, बैठकव्यवस्था, ध्वनीव्यवस्था, व्याख्यात्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था ही जबाबदारी केंद्राची आहे. व्याख्यात्यांचा प्रवास, मानधन इत्यादि खर्च विद्यापीठ देईल. या खर्चाच्या मागणीपत्रावर केंद्राधक्षांची सही असणे आवश्यक असते.

 

ग्रामीण केंद्र सुरु करण्यासाठी बहि:शाल शिक्षण विभागाच्या कार्यालयात थेट संपर्क साधावा.

 
 
 
 
 
मुख्य पान | आमच्याविषयी | प्रमाणपत्र अभ्यासक्रम | उपयुक्त अभ्यासक्रम | सुट्टीतले अभ्यासक्रम |
आमची प्रकाशने | ग्रामीण कार्यक्रम | संपर्क | इंग्रजी
 
Copyright © 2009, Extra Mural Studies. All rights reserved. Designed and Maintained by Raja Cybertech Ltd.